नवी दिल्ली - खासगी विमान कंपनी एअर एशियाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून एअर एशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी एक खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी यूपीए सरकारसोबत मिळून कारस्थान रचत निरमांमध्ये बदल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात एअर एशियाकडून तत्कालीन हवाई वाहतूक मंत्र्यांना तब्बल 50 लाख डॉलर एवढी लाच देण्यात आली होती. मात्र एअर एशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित धागेदोरे मिळवण्यासाठी सीबीआयने बुधवारी एअर एशियाच्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू या शहरातील कार्यालयांवर धाडी टाकल्या. या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचे ईमेल, लाच आणि सरकारी नोट्स सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकतात. मात्र एअर एशियाकडून या आरोपांचे खंडन करण्यात येत आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक महिना आधी हा कट रचण्यात आला. हे प्रकरण अन्य बाबींबरोबरच एअर एशिय आणि टाटा ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवर आधारित आहे. तसेच यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान हवाई वाहतूक मंत्र्यांना करोडो रुपयांची लाच देण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच, एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:38 PM