मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:33 PM2019-02-19T22:33:19+5:302019-02-19T22:35:01+5:30
1 कोटी कर्मचारी, पेन्शन धारकांना होणार फायदा
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आधी 9 टक्के इतका होता. आता तो 12 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना मिळेल. या लाभार्थींची संख्या 1 कोटी इतकी असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जेटली म्हणाले. त्यामुळे 1 जानेवारी 2019 पासून महागाई भत्ता 12 टक्के असेल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 9168.12 कोटी रुपयांचा भार पडेल. याचा लाभ 48.41 लाख कर्मचाऱ्यांना, तर 62.03 लाख निवृत्ती वेतन धारकांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीला काही दिवस राहिले असताना सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
संसदेचं अधिवेशन संपल्यानं काही महत्त्वाची विधेयकं मंजूर करता आली नाहीत. यातील काही विधेयकांना विरोधकांचाही पाठिंबा होता, असं जेटलींनी सांगितलं. यातील तीन विधेयकं अध्यादेशाच्या माध्यमातून लोकसभेत मांडण्यात आली होती. ती लोकसभेत मंजूरदेखील झाली. मात्र राज्यसभेत गदारोळामुळे ती मंजूर होऊ शकली नाहीत. त्यामुळे ही विधेयकं केंद्रीय मंत्रिमंडळानं यासाठीचे अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवले आहेत. लवकरच राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतील, असं जेटली म्हणाले. राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेल्या अध्यादेशांमध्ये तिहेरी तलाकच्या अध्यादेशाचा समावेश आहे.