Corona Vaccination: लहान मुलांचं कोरोना लसीकरण कधी?; मोदी सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:22 PM2021-07-16T22:22:37+5:302021-07-16T22:24:42+5:30
Corona Vaccination: मोदी सरकारकडून दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र देशात सध्या १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी लसच उपलब्ध नाही. १८ वर्षांखालील व्यक्तींचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण लक्षणीय आहे. मात्र या वर्गासाठी लसच नसल्यानं चिंता वाढली आहे. या वर्गाच्या लसीकरणाबद्दल मोदी सरकारनं महत्त्वाची माहिती दिली आहे.
मोदी सरकारकडून काल दिल्ली उच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर करण्यात आलं. त्यामध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटातील लसीकरणाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. झायडस कॅडिलानं १२ ते १८ वर्षे वयोदटासाठी डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस ZyCoV-Dच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती सरकारनं शपथपत्राच्या माध्यमातून दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी १५ जुलैला दिल्ली उच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केलं. 'झायडस कॅडिलानं १२ ते १८ वर्षे वयोगटासाठीच्या लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या लसीला लवकरच परवानगी मिळेल. त्यामुळे १२ ते १८ वर्षांमधील व्यक्तींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात होऊ शकेल,' असं मोदी सरकारनं शपथपत्रात नमूद केलं आहे.
१२ ते १८ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लस कधी मिळणार अशी विचारणा एका अल्पवयीन मुलीनं याचिकेच्या माध्यमातून केली होती. या याचिकेला केंद्रानं शपथपत्राच्या माध्यमातून उत्तर दिलं. गेल्याच महिन्यात याविषयाची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. झायडस कॅडिलाची लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. १ जुलैला तशी माहिती कंपनीनंच दिली होती. ZyCoV-D लस ४५ ते ६० दिवसांत उपलब्ध होऊ शकेल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं होतं.