बांगलादेशातहिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक नेत्यांनाही तेथील हिंदूंच्या सुरक्षितते प्रति चिंता व्यक्त केली आहे. यातच आता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (11 डिसेंबर) केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. याच बरोबर बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना आणावे, असेही ममता यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ममता जगन्नाथ मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी दीघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, "केंद्राने हिंसाग्रस्त बांगलादेशात अल्पसंख्यकांना सुरक्षितता द्यायला हवी. तसेच, ज्यांची परत येण्याची इच्छा असेल, त्यांना परत आणायला हवे. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा हवी आहे, यासंदर्भात केंद्राने कारवाई करावी."
"काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत आहेत" -याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल.
हिंदूंवर होतायत हल्ले - बांगलादेशच्या 17 कोटी लोकसंखेत 8 टक्के अल्पसंख्याक हिंदू आहेत. या हिंदूंना 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. हिंदू धर्माला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अनेक मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मंदिरातील मूर्तींचीही मोडतोड करण्यात आली आहे.