चंदा कोचर यांच्याविरुद्ध कारवाई केलेल्या अधिकाऱ्याची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:29 AM2019-01-28T05:29:22+5:302019-01-28T05:29:51+5:30
जेटलींच्या नाराजीचा परिणाम?; सीबीआयचा प्रतिक्रियेस नकार
नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच संबंधित सीबीआय अधिकाºयाची बदली करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सुधांशू धर मिश्रा हे सीबीआयच्या बँकिंग अॅण्ड सिक्युरिटी फ्रॉड सेलमध्ये होते. त्यांनी ही कारवाई करताच, त्यांची रांचीत सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. अमेरिकेत उपचारासाठी गेलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चंदा कोचर यांच्यावर झालेल्या सीबीआय कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच मिश्रा यांची बदली झाली, अशी चर्चा आहे. सरकारमधील सूत्रांनी या बदलीचा आणि जेटली यांच्या टिष्ट्वटचा संबंध नाही, असे म्हटले आहे. ज्येष्ठ व्यक्तींविरोधात पुराव्याअभावी अशी कारवाई केली, तर कामेच ठप्प होतील, असे जेटली म्हणाले होते.
काँग्रेसची टीका
जेटली यांचे वक्तव्य आणि त्यानंतर सुधांशू धर मिश्रा यांची झालेली बदली याची गंभर दखल घेत काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न जेटली यांनी केला. आपल्या विधानांतून त्यांनी सीबीआयसारख्या तपास यंत्रणेला धमकावले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.