नवी दिल्लीः भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 लवकरच चंद्रावर उतरणार आहे. तत्पूर्वीच चंद्राच्या पृष्ठभागावरील काही छायाचित्रं इस्रोनं प्रसिद्ध केली आहेत. चंद्रावरची ही छायाचित्रं इस्रोच्या चांद्रयान 2 (Chandrayaan 2) यानातील Terrain Mapping Camera-2 (TMC-2)ने टिपली आहेत. इस्रोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या छायाचित्रांवरून चंद्रावरील खड्डे (Impact Crater) आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांना जॅक्सन, माच, कोरोलेव्ह आणि मित्रा अशा नावानं संबोधण्यात आलं आहे. क्रेटर्सला मित्रा हे नाव(प्रा. सिसिर कुमार मित्रा) यांच्या नावावरून देण्यात आले आहे. 23 ऑगस्टला चंद्रापासून 4375 किलोमीटर अंतरावरून ही छायाचित्रे टिपण्यात आली असून, इस्रोने ट्विट करत ही छायाचित्रं व्हायरल केली आहेत.
तत्पूर्वी चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2650 किलोमीटर अंतरावरून काही फोटो टिपण्यात आले होते. चांद्रयान - २मधील विक्रम रोव्हर लँडरने 21 ऑगस्ट रोजी काही फोटो टिपले होते. टिपलेल्या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत. अनेक ग्रह आणि उपग्रहांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना Impact Crater असे म्हटले जाते. जॅक्सन हा चंद्राच्या उत्तरेकडच्या गोलार्धात पाहायला मिळाला. तर कोरोलेव्ह हा चंद्राच्या उत्तरेकडील अक्षांशात पडलेला एक खड्डा आहे. सध्या उपलब्ध असलेल्या या क्रेटर्स(खड्ड्यां)पैकी काही क्रेटर्स हे 50 हजार वर्षे जुने आहेत.