चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर; पुढील तारीख अनिश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:47 AM2019-01-02T05:47:19+5:302019-01-02T05:47:36+5:30
चंद्राच्या पृष्ठभागापैकी ज्या भागाचा अद्याप अभ्यास झालेला नाही त्याचे निरीक्षण करण्याकरिता चीनने प्रक्षेपित केलेले चांग ४ हे अवकाशयान तीन जानेवारी रोजी चंद्रावर उतरणार आहे.
बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागापैकी ज्या भागाचा अद्याप अभ्यास झालेला नाही त्याचे निरीक्षण करण्याकरिता चीनने प्रक्षेपित केलेले चांग ४ हे अवकाशयान तीन जानेवारी रोजी चंद्रावर उतरणार आहे. नेमके याच तारखेला चांद्रयान-२ या अवकाशयानाचे प्रक्षेपण करण्याचे इस्रोने ठरविले होते; पण आता ते पुन्हा लांबणीवर पडले असून, या मोहिमेसाठी पुढची तारीख अजून निश्चित झालेली नाही.
इस्रोचे अध्यक्ष शिवन के. यांनी म्हटले आहे की, २०१८ च्या उत्तरार्धात इस्रोने अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्यात व्यग्र असल्याने चांद्रयान-२ मोहिमेच्या पूर्वतयारीवर परिणाम झाला.
चांद्रयान-२ हे अवकाशयान आता कधी प्रक्षेपित करायचे याबाबत येत्या १० ते १२ दिवसांत निर्णय घेतला जाईल. पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला चंद्राची जी झाकोळलेली बाजू असते तेथील पृष्ठभागावर चांग-४ उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरून चांद्रयान-२ तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार होते.
चांग ४ या अवकाशयानाने अपेक्षित कक्षेत प्रवेश केला असल्याचे चीनच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र, ते चंद्रावर कधी उतरणार, याची माहिती दिलेली नाही. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यासाठी २०१७ व गेल्या वर्षी इस्रोने जोरदार पूर्वतयारी केली होती. मात्र, काही अडचणींमुळे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)
चंद्रावरील पाण्याचे नमुने आणणार
नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतही या उपग्रहाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता नाही, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा अंश शोधला होता.
२००८ साली या अवकाशयानाचे प्रक्षेपण झाले होते; परंतु त्याच वर्षी २२ आॅक्टोबर रोजी त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर चांद्रयान-१ चंद्राभोवती प्रदक्षिणा करताना नासाला आढळून आले होते. चंद्रावरील पाण्याचे नमुने आणण्यासाठी चांद्रयान-२ तेथील पृष्ठभागावर खोदकाम करणार आहे.