पाटना - आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत. आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच, या बैठकीमुळे देशात बदल घडवण्याची सुरुवात पाटणातून झाल्याचंही ते म्हणाले.
शरद पवार यांनी बैठकीनंतर बोलताना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली. जयप्रकाश यांनी एक संदेश दिला आणि देशात संपूर्ण वातावरण बदललं होतं, असे पवार यांनी म्हटलं. बिहारमधून अनेक आंदोलनांची सुरुवात झाली आणि ते जनतेनं स्विकारले. आज नितीश कुमार यांनी येथे बैठका बोलावली, त्यासाठी सर्वपक्षीय सहकारी एकत्र आले. या बैठकीत चर्चा झाली, त्यातून सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याचं निश्चित केलं आहे. एक नवीन रस्ता दाखवण्याचं काम इथून सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की देशातील जनता याचं समर्थन करेल, असे शरद पवार यांनी म्हटले.
देशात आज दररोज एक नवीन समस्या पाहायला मिळत आहे. धार्मिक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजाच्या एकतेसाठी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा आपल्याला सामना करावा लागेल. हा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपापसांत काहीतरी मतभेद असू शकतात. मात्र, राष्ट्रहितासाठी आपल्यातील मतभेदांकडे दुर्लक्षित केलं पाहिजे. मला विश्वास आहे की, पाटना येथून झालेली ही सुरुवात, देशात बदल घडवण्याची सुरुवात ठरेल, असेही शरद पवार यांनी म्हटले.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे
या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व नेते एकत्रित आले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकजूट झाले. पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील महिन्यात १० किंवा १२ जुलैला हिमाचल प्रदेशातील शिमला इथं पुन्हा विरोधकांची बैठक होईल. वेगवेगळ्या राज्यात आम्हाला समान कार्यक्रमाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व रणनीती आखून निर्णय घेऊ. हीच एकजूट ठेऊन २०२४ ची निवडणूक लढायची आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढायचा यात आम्हाला यश आले. आजची बैठक नितीश कुमार यांनी बोलावली, त्यांचे धन्यवाद देतो. भारत जोडो यात्रेतून आम्ही ज्याज्या ठिकाणी गेलो तिथले सगळे नेते आजच्या बैठकीला उपस्थित झालेत असं खरगेंनी सांगितले.