नवी दिल्ली: सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील बडतर्फ महिला कर्मचाºयाने या आरोपांच्या चौकशीसाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘इन हाऊस’ चौकशी समितीच्या रचनेस आक्षेप घेतले आहेत.न्यायालयातील विश्वसनीय सूत्रांनुसार येत्या शुक्रवारी चौकशसाठी हजर राहण्याची नोटीस समितीकडून मिळाल्यानंतर या महिलेने चौकशी समितीस एक पत्र लिहून हे आक्षेप घेतले आहेत. सूत्रांनुसार चौकशी समितीवर न्या. एन. व्ही. रमणा यांच्या नियुक्तीस या महिलेचा आक्षेप आहे. ही तक्रारदार महिला पत्रात लिहिते की, न्या. रमणा सरन्यायाधीशांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. मी सरन्यायाधीशांच्या निवासी कार्यालयात काम करत होते त्यामुळे न्या. रमणा यांचे सरन्यायाधीशांच्या घरी नेहमी येणे-जाणे असते व ते अगदी सरन्यायाधीशांच्या घरच्यासारखे आहेत हे मी अनुभवाने जाणते. त्यामुळे न्या. रमणा समितीवर असले तर नि:ष्पक्ष चौकशी होऊन मला न्याय मिळेल, असे मला वाटत नाही.चौकशी समितीत न्या. इंदिरा बॅनर्जी या एकट्याच महिला सदस्य असण्यासही तक्रारदार महिलेस आक्षेप आहे. त्यासंबंधात ती पत्रात लिहिते की, कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी कशी करावी याचे नियम आधी याच न्यायालयाने विशाखा प्रकरणात ठरवून दिले व नंतर तसा कायदाही केला गेला आहे. त्यानुसार चौकशी समितीत बहुसंख्य सदस्य महिला असाव्यात असे बंधन आहे. त्यामुळे समितीवर तीनपैकी फक्त एकच महिला सदस्य असणे कायद्याला धरून नाही. सूत्रांनी तिच्या पत्राच्या हवाल्याने असेही सांगितले की, गेल्या शनिवारी सरन्यायाधीशांनी स्वत: विशेष खंडपीठात बसून आपल्याविषयी जी एकतर्फी वक्तव्ये केली त्यासही तिने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.सर्व कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कराचौकशीत नेमके काय झाले याविषयी नंतर कोणत्याही प्रकारच्या वादाला जागा राहू नये यासाठी चौकशीच्या सर्व कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे व चौकशीत आपल्याला वकील घेण्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी तिने पत्रात केली असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
सरन्यायाधीशांवरील आरोप: ‘त्या’ तक्रारदार महिलेचे चौकशी समितीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:51 AM