चेन्नई: सर्वसामान्यपणे एका माणसाच्या शरीरात दोन किडनी असतात. मात्र चेन्नईत वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात पाच किडनी आहेत. त्याच्यावर नुकतीच एक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही व्यक्ती रुग्णालयातून बाहेर आली तेव्हा तिच्या शरीरात एकूण ५ किडनी होत्या. या व्यक्तीवर एकूण तीन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी होईल, अशी आशा डॉक्टरांना आहे. तसं झाल्यास आधीच दोन प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींसाठी आशेचा किरण निर्माण होईल.
चेन्नईतील रुग्णावर नुकतीच तिसरी शस्त्रक्रिया पार पडली. १९९४ मध्ये ही व्यक्ती १४ वर्षांची असताना तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या. त्यानंतर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेची गरज भासली. त्यामुळे २००५ मध्ये पुन्हा एकदा प्रत्यारोपण करण्यात आलं. ते १२ वर्षे चाललं. मात्र पुढील ४ वर्षांनंतर रुग्णाला दर आठवड्यातून तीनदा डायलिसिस करण्याची गरज निर्माण झाली.
रक्तदाब वाढल्यानं संबंधित व्यक्तीवर झालेल्या दोन शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याची माहिती डॉक्टर एस. सर्वनन यांनी दिली. 'यावर्षी मार्चमध्ये हृदयात झालेलं ब्लॉकेज दूर करण्यासाठी ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. रुग्णाची प्रकृती गंभीर झाली,' असं सर्वनन यांनी सांगितलं. या परिस्थितीत डॉक्टरांकडे केवळ पर्याय होता. किडनी प्रत्यारोपणासाठी तिसरी शस्त्रक्रिया करण्यावाचून गंत्यतर नव्हतं.
रुग्णाच्या शरीरात आधीच दोन किडनी होत्या. मात्र त्या खराब झाल्या होत्या. याशिवाय दोन डोनर किडनीदेखील होत्या. अशा परिस्थितीत पाचव्या किडनीसाठी डॉक्टरांना जागा करायची होती. नव्या किडनीला धमन्यांसोबत जोडणं अतिशय आव्हानात्मक होतं. निकामी झालेल्या चार किडनी आधीच शरीरात असल्यानं आणखी एका किडनीसाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी नव्या किडनीसाठी आतड्यांजवळ जागा निर्माण केली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आणि शिरा या किडनीला जोडण्यात आल्या. अशा प्रकारची शस्त्रक्रिया अतिशय दुर्मीळ मानली जाते.