चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:52 AM2021-11-08T08:52:13+5:302021-11-08T08:52:19+5:30
चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे.
चेन्नई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तमिळनाडूतील चेन्नई व काही भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. मात्र, चेन्नईमध्ये २०१५ सालानंतरचा पडलेला सर्वाधिक मुसळधार पाऊस अशी या पावसाची नोंद करण्यात आली.
नंगमबक्कम भागामध्ये २१५.३ मिमी, तर मीनांबक्कम येथे ११३.६ मिमी पाऊस पडल्याची रविवारी सकाळी आठ वाजता नोंद करण्यात आली.
चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. हवामानाचे अभ्यासक आर. प्रदीप जॉन यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की, शनिवारी रात्रीपासून चेन्नईमध्ये पडलेला पाऊस हा २०१५नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस आहे. संततधारेमुळे चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
तमिळनाडूमध्ये शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तमिळनाडूच्या पूर्व भागातील किनारपट्टी प्रदेशात पाऊस अधिक प्रमाणात पडत आहे.