छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीनिमित्त महिलांना मोठी भेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. बघेल म्हणाले की, आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर देवी लक्ष्मीच्या कृपेने आणि आशीर्वादाने राज्यातील महिला शक्तीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे सरकार स्थापन होताच राज्यातील महिलांना ‘छत्तीसगड गृह लक्ष्मी योजने’ अंतर्गत दरवर्षी 15 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात दिले जातील.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "माझ्या माता आणि भगिनींनो! आजच्या शुभ मुहूर्तावर छत्तीसगडमध्ये लक्ष्मी देवीची अपार कृपा होवो."
"ज्या प्रकारे माता लक्ष्मीने छत्तीसगडच्या जनतेला आपला आशीर्वाद पाच वर्षांपासून दिला आहे आणि आम्ही आमचे मिशन सुरू केले आहे. माझा छत्तीसगड श्रीमंत झाला पाहिजे आणि आपण गरिबीचा शाप नाहीसा करू या संकल्पाने आमच्या सरकारने पाच वर्षे काम केले आहे. आजच्या शुभदिनी, आपण आपल्या माता-भगिनींना अधिक समृद्ध आणि सक्षम पाहू इच्छितो."
"आजच्या शुभ मुहूर्तावर मी जाहीर करतो की, तुम्ही काँग्रेसला मतदान करा, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करा, आम्ही "छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना" सुरू करू, ज्याअंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला वर्षाला 15,000 रुपये देऊ. मी तमाम माता भगिनींना सांगू इच्छितो की, तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही, फॉर्म भरण्याचीही गरज नाही. काँग्रेसचे सरकार बनवा, सरकार स्वतः तुमच्या घरांचे सर्वेक्षण करेल, सर्व काही ऑनलाइन होईल आणि थेट तुमच्या खात्यात पैसे येतील. रांगेत उभे राहण्याची गरज नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.