रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण 1079 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणातून आपलं नशिब आजमावत आहेत. भाजपाकडून 9 मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या 3 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी 76.28 टक्के मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान होत असून 11 डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे. राज्यात यंदा बहुतांश पक्षांनी तरुण उमेदवारांवर जास्त विश्वास दाखविला आहे. आजच्या निवडणुकीत थोडेथोडके नव्हे तर 42 टक्के उमेदवार हे चाळिशीच्या आतील आहेत. त्यापैकी 11 टक्के उमेदवार 25 ते 30 याच वयोगटातील आहेत. ‘एडीआर’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकांतील 72 जागांवर एकूण 1 हजार 79 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील 1 हजार 69 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार 42.40 टक्के उमेदवार हे 25 ते 40 या वयोगटातील आहेत, तर 515 उमेदवार हे 41 ते 60 या वयाचे आहेत. केवळ एक उमेदवार 80 हून अधिक वयाचा आहे. यंदा 11.72 म्हणजेच 125 उमेदवार तिशीच्या आतील आहेत.