नवी दिल्ली : गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीला ५ वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्ष करून दाखवाच, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील विधानाला काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी तितक्याच जोरकसपणे उत्तर दिले असून, त्यांनी आतापर्यंतच्या बिगर नेहरू-गांधी परिवारातील काँग्रेस अध्यक्षांची यादीच सादर केली आहे. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये मोदी यांनी काँग्रेसला हे आव्हान दिले होते.त्याला उत्तर देताना चिदम्बरम यांनी १९४७ नंतर आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, कामराज, निजलिंगप्पा, सी. सुब्रमण्यम, जगजीवनराम, शंकरदयाळ शर्मा, डी. के. बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी. व्ही. नरसिंह राव व सीताराम केसरी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते, असा पलटवार केला आहे. मोदी यांची स्मरणशक्ती कमजोर असल्याचेही चिदम्बरम यांनी त्यांना सुनावले आहे.या विषयावर बोलणार का?शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, महिला तसेच मुलींवरील अत्याचार, गोरक्षकांचे तसेच दहशतवाद्यांचे सतत होणारे हल्ले, झुंडशाहीने हत्या या विषयांवर मोदी आता तरी बोलतील का, असा सवालही चिदम्बरम यांनी केला आहे.
चिदम्बरम यांनी सादर केली १५ अध्यक्षांची यादी; सारेच गांधी-नेहरू घराण्याबाहेरील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 5:43 AM