नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे भावी सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गोगई यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यामुळे रंजन गोगई यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी यापूर्वीच या पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली होती. दिपक मिश्रा 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती गोगोई हे 3 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. त्यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील. मिश्रा यांच्याकडे कामकाजासाठी अद्याप 20 दिवसांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे आगामी 20 दिवसांत त्यांच्याकडून काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बाबरी मशिद आणि राम जन्मभूमीबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.