गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर घालणार बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:34 AM2017-09-18T08:34:56+5:302017-09-18T08:38:35+5:30
गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार आहे.
पणजी, दि. 18- गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी याबद्दलची माहिती दिली आहे. पुढील महिन्यात या संदर्भातील अधिसूचना काढली जाणार असल्याचंही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलं आहे. मद्यपान करुन अनेकदा लोक गोंधळ घालत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर गोव्यात बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी सध्याच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील, असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हंटलं आहे.
गोव्यात जर कोणाला मद्यपान करायचं असेल तर त्याने सार्वजनिक ठिकाणी करू नये. पुढील 15 दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचंही पर्रीकरांनी सांगितलं आहे. गोव्यातील मद्य दुकानदार जे ग्राहकांना दुकानाच्या बाजूला थांबून मद्यपान करण्याची परवानगी देता, अशा दुकानदारांना दंड आकारला जाईल किंवा त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असं पर्रीकर म्हणाले आहेत.
‘सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर बंदी आणण्यासाठी अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. ही अधिसूचना ऑक्टोबरमध्ये काढण्यात येईल. त्यासाठी आम्हाला सध्याच्या नियमांमध्ये बदल करावा लागेल,’ असं पर्रीकर यांनी पणजीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. सध्या गोवा सरकारकडून राज्यातील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना गोवा, दमण आणि दिव अबकारी कायदा, १९६४ च्या अंतर्गत परवाने दिले जातात. याआधी गोवा सरकारने काही ठराविक सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय गोव्यातील टू-व्हिलर चालकांना हेल्मेट घालण्याची सवय व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही पर्रीकरांनी सांगितलं.
सूर्यास्तानंतर तसंच दारू प्यायल्यानंतर समुद्रात पोहण्यास गोव्यामध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताव
मद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे. गोव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू पावणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही बंदी घालण्याच्या विचारात सध्या गोवा सरकार आहे. मद्य प्राशन केल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या खेरीज पर्यटकांशी संबंध येणाऱ्या सगळ्या स्थानिकांनी पर्यटकांना काळोख पडल्यानंतर समुद्रात उतरण्यास मज्जाव करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोव्यातल्या सगळ्या बीचेसवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात लाइफगार्ड असतात, मात्र रात्री ते नसतात आणि याच वेळात पर्यटक बुडण्याची शक्यता जास्त असते.