हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात! भाजपा पक्षश्रेष्ठींनी मनोहर लाल खट्टर यांना बोलावले दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 11:21 AM2017-08-26T11:21:21+5:302017-08-26T11:30:33+5:30
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.
नवी दिल्ली, दि. 26 - हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणे आले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे. एकूणच खट्टर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. हरयाणात पंचकुला आणि अन्य भागात शुक्रवारी जो हिंसाचार झाला त्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला तर, 250 पेक्षा जास्त जखमी झाले.
प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.
2014 मध्ये रामपाल नावाच्या बाबाला अटक करताना झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाट आंदोलनाच्यावेळी 30 जणांना प्राण गमावावे लागले होते. आता गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. एकूणच महत्वाच्या प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यात मनोहर लाल खट्टर सरकार अपयशी ठरले आहे.
दरम्यान साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम एक सामान्य कैदीच असून त्याला एसी, मदतनीस अशी चैनीची कोणतीही सुविधा दिलेली नाही असे हरयाणाचे तुरुंग अधिकारी के.पी.सिंह यांनी सांगितले. काही वृत्तवाहिन्या, पेपर्स राम रहीमला विशेष वागणूक दिल्याच्या बातम्या दाखवत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करतो राम रहीम सुनारीया तुरुंगात आहे, कुठल्याही अतिथिगृहात नाही त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळया सुविधा दिलेल्या नाहीत असे के.पी.सिंह यांनी सांगितले.
राम रहीमला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असून, त्याची अन्य कैद्यांपासून वेगळी खास व्यवस्था करण्यात आली आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. राम रहीमला तुरुंगात पिण्यासाठी मिनरल वॉटरचे पाणी तसेच बाहेरुन जेवण मागवण्याची मुभा दिली असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते.