मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचे नेटवर्क गायब झाले! पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना मध्यरात्री उचलून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 11:03 AM2018-12-05T11:03:23+5:302018-12-05T11:05:19+5:30
अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल.
रांची - अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. असाच अनुभव झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना आला. राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे सोमवारी रात्री राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्या, मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर तातडीने कार्यरत झालेल्या पोलिसांनी बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. अखेरीस पहाटे तीन वाजता या अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
राजभवनात थांबलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलला नेटवर्क न आल्याने दुमका येथील टेलिकॉम जिल्हा व्यवस्थापक पी. के. सिंह आणि सहाय्यक ज्युनिअर टेलिकॉम अधिकारी यांना शिक्षा म्हणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांना मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली होती.
दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच ही कारवाई म्हणजे मुख्यमंत्र्यांचे फॅरिस्ट विचार आहेत, ''असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या मोबइलला नेटवर्क आले नाही म्हणून या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. ही बाब मुख्यमंत्र्यांती फॅसिस्ट विचारसरणी अधोरेखित करते.'' असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बीएसएनएल कर्मचारी संतप्त झाले आहे.