लडाख सीमेवरील चीनची सैन्य जमवाजमव चिंताजनक, लष्करप्रमुख जनरल नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:15 AM2021-10-10T07:15:18+5:302021-10-10T07:23:34+5:30
India-China News: पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले.
नवी दिल्ली : पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले. चिनी लष्कराच्या (पीएलए) कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
नरवणे यांनी म्हटले की, चीनकडून सलग दुसऱ्या हिवाळ्यात येथील लष्करी जमवाजमव कायम ठेवली गेली; तर येथील स्थिती एलओसीसारखी (पाकसोबतची नियंत्रण रेषा) होईल. चिनी लष्कर सीमेवर कायम राहिले, तर भारतीय लष्करही तैनात राहील.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर मागील १७ महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर काही चौक्यांहून दोन्ही देशांनी माघार घेतली असली, तरी अनेक ठिकाणी अजूनही सैन्याच्या तुकड्या तैनात आहेत.
अफगाणी अतिरेकी काश्मिरात घुसण्याचा धोका -लष्करप्रमुख
- अफगाणिस्तानातील स्थिती स्थिर झाल्यानंतर तेथील अतिरेकी जम्मू-काश्मिरात घुसू शकतात, अशी भीती लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे.
- नरवणे यांनी सांगितले की, दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती, तेव्हा अफगाणी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरात घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. मात्र, आपली घुसखोरी विरोधी व्यवस्था मजबूत आहे तसेच आपली संरक्षण दले कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास समर्थ
आहेत.
- काश्मिरात वाढलेल्या नागरिकांच्या हत्या आणि अफगाणमधील तालिबान राजवट यांच्यात काही संबंध आहे का, असा प्रश्न जनरल नरवणे यांना विचारण्यात आला होता.
- त्यावर त्यांनी म्हटले की, याबाबत काही सांगणे अवघड आहे. मात्र, याआधीच्या तालिबानी राजवटीचे वेळी घुसखोरी वाढली होती. आताही ती वाढण्याचा धोका आहे.