नवी दिल्ली - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीन बलाढ्य देश होईल, मात्र भारतदेखील दुबळं राष्ट्र नाही आणि भारतात कोणालाही घुसखोरी करण्याची परवानगी मिळणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे. भारताने आपल्या उत्तरेकडील सीमारेषेवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे असंही ते बोलले आहेत. चीनच्या आक्रमकतेचा सामना करण्याठी भारत पुर्णपणे सक्षम असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत यांनी सांगितलं की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं.
यावेळी बिपीन रावत यांनी दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात आलेल्या चेतावणीवर बोलताना भारताला याचे काय परिणाम होतायच याची वाट पहावी लागेल असं म्हटलं आहे. ते बोलले की, 'पाकिस्तानमध्ये दहशतवादी वापरुन फेकून देण्याची गोष्ट आहे. पाकिस्तानला आपल्या चूक लक्षात येऊन वेदना झाल्या पाहिजेत याची खात्री भारतीय लष्कर करत आहे'.
'अमेरिकेकडून पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्यात आल्याने आता जेव्हा कधी दहशतवादाचा मुद्दा येईल तेव्हा भारताचं काम अमेरिका करुन टाकेल हे भारताने समजून घ्यायला हवं', असं त्यांना यावेळी सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं की, 'सर्व काही गोष्टी व्यवस्थित सुरु आहेत असं म्हणणं थोडं घाईचं होईल. आता अमेरिका आपलं काम करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही'.
तिथे पाकिस्तानात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असणा-या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून मसूद अजहर बोलला आहे की, 'पाकिस्तानी मीडिया आणि बुद्धीजीवी लोक डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी पुर्ण करण्याचा सल्ला देत पाकिस्तानमधील लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत'. मसूद अजहर याचं वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली आहे.