मुंबई : कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. विषबाधाप्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही त्यांनी मान्य केले.विदर्भात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे १८ शेतक-यांचा मृत्यू झाला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत फुंडकर म्हणाले की, विषबाधेची घटना दुर्दैवी आहे. विदर्भातील कडक उन्हामुळे पिकांवरील फवारणी करताना शेतकरी अनेकदा मास्क किंवा कोट न घालताच फवारणी करतात. त्यातच चिनी बनावटीचे स्प्रेने फवारणी करताना शेतक-यांच्या अंगावरच किटकनाशकाचा फवारा येतो आणि विषबाधा होते, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून विषबाधेमुळे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याची बाब पोलिसांना किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हती. यवतमाळ जिल्ह्यात व्यवस्था असतानाही रुग्णांना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. नागपूरातील सरकारी रूग्णालयातील उपचारादरम्यान रूग्णांना बाहेरून औषधे आणि रक्त तपासणीचे अहवाल आणण्यास सांगण्यात आले. त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.चौकशीसाठी निवेदनशेतक-यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे निवेदन सोपवले. कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे. संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशीही मागणी त्यांनी केली.महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने अंगणवाडी सेविकांना फक्त साडेसहा हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवावा, हे अयोग्य असून त्यांनाही १० हजार रुपये मानधन द्यावे, असे विखे म्हणाले.