1998 साली कारगिलमध्ये होते चिनी सैन्य ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 01:40 PM2017-07-26T13:40:04+5:302017-07-26T13:51:42+5:30
1999 साली कारगिलमध्ये युद्ध लढले गेले. पण त्याच्या एकवर्षआधी 1998 साली कारगिलमध्ये चिनी सैनिकांना पाहण्यात आले होते.
नवी दिल्ली, दि. 26 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली कारगिलमध्ये चौथे युद्ध लढले गेले. पण त्याच्या एकवर्षआधी 1998 साली कारगिलमध्ये चिनी सैनिकांना पाहण्यात आले होते. त्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात लष्कराने तयार केलेल्या नऊ पानी गुप्तचर अहवालात चिनी सैनिक दिसल्याचा उल्लेख आहे. कारगिल युद्ध संपल्यानंतर 121 इनफँट्री ब्रिगेडचे ब्रिगेडीयर सुरींदर सिंह यांना गोपनीय माहिती लीक केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
ब्रिगेडीयर सिंह यांनी 25 ऑगस्ट 1998 रोजी यासंबंधीचा अहवाल त्या भागाच्या जनरल कमांडीग ऑफीसर जेओसींना पाठवला होता. ब्रिगेडीयर सिंह यांनी त्यांच्या निलंबनाला आव्हान दिले असून, चंदीगडच्या लष्करी लवादासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
मे 1999 साली या भागात भारत -पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटले. 26 जुलै 1999 रोजी हे युद्ध संपले. ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते.
त्यावेळच्या वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी ब्रिगेडीयर सिंह यांचा दावा फेटाळून लावला होता. कारगिल युद्धात चीनचा सहभाग असल्याचे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत असे त्यावेळी लष्करी अधिका-यांनी म्हटले होते. लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के.जे.सिंह यांनी चीनच्या सहभागाचा दावा फेटाळून लावला. पाकिस्तान काही करत असेल तर, चीन त्यात तात्काळ उडी घेणार नाही असे त्यांनी सांगितले. चीनने असा काही प्रयत्न केला असता तर, पाकिस्तानने नक्कीच त्याचा फायदा उठवला असता. चीनची त्यावेळी भूमिका तटस्थतेची होती असे एका निवृत्त अधिका-यांनी सांगितले.
1965 आणि 1971 या दोन्ही युद्धांमध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू फक्त चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला. या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता.