नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एलएसीजवळील केवळ २० किलोमीटर अंतरावर चीनने बांधकामही सुरू केल्याने भारताच्या बाजूने सतर्कता बाळगण्यात येत आहे. लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.अरुणाचल प्रदेशच्या असाफिला, तुतिंग, चांग त्से व फिशटेल-२ सेक्टरमध्ये चीनच्या सैन्याची जमवाजमव सुरू आहे. विशेष म्हणजे हा भाग एलएसीपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे व तेथे चीनने काही बांधकामही सुरू केलेले आहे. या ठिकाणी चीनने कोणतीही आगळीक केली तरी भारत त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे व भारतानेही या भागात आपली तैनाती वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे लडाखजवळील स्पांगूर गॅपमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तेथे चीनने रणगाडे, तोफा व सैनिकांची तैनाती केली आहे. भारतानेही आपल्या बाजूने तेथे पूर्ण सज्जता केली आहे. त्यापाठोपाठ आता अरुणाचलातही दोन्ही सैन्य समोरासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.संरक्षणमंत्री : भारतीय जवान सज्जभारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांत रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या वेळी चीनचे ६० पेक्षा अधिक सैनिक भारताने ठार केल्याचे आता समोर आले आहे. तो कट भारताने हाणून पाडल्यानेच चीनकडून आता अरुणाचलात दुसरा कट रचला जातोय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनचे सैनिक गस्त घालण्यासाठी एलएसीच्या अगदी जवळ येत असल्याचेही निरीक्षण भारताने नोंदवलेले आहे. तसेच चीनकडून होत असलेल्या बांधकामाचीही गंभीर नोंद घेतलेली आहे.काही वर्षांपूर्वी चीनने डोकलाम भागात भूतानच्या भूभागावर रस्ते बांधल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होत आहे, असेही भारताने म्हटले होते.
अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्याला हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:34 AM