नवी दिल्ली - बिहारमध्ये लोक जनशक्ति पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांची गेल्या काही दिवसांपासून आपलं भाषण आणि नितीश कुमार यांच्यावर साधत असलेल्या निशाण्यामुळे चर्चा रंगली होती. मात्र आता चिराग पासवन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चिराग हे त्यांचे वडील स्वर्गीय रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असताना दिसत आहे.
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांचा प्रॅक्टिस करतानाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. व्हिडीओमध्ये चिराग हे रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत होते. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोकं होती. त्यांना ते काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचं ते विसरले आणि पुन्हा शूट करण्यास सांगू लागले.
"असं नाटक करणं हे लज्जास्पद", काँग्रेसचा हल्लाबोल
उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या पंखुरी पाठक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच असं नाटक करणं हे लज्जास्पद असल्याचं देखील म्हटलं आहे. "अशा नाटकी लोकांमुळेच राजकारण हे बदनाम झालं आहे. लोकांनी जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच काढलं पाहिजे" असं पंखुरी पाठक यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Bihar Election 2020 : "...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल
चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयू (JDU) वर जोरदार निशाणा साधला होता. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला होता. "लोक जनशक्ती पार्टी जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील" असं चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. चिराग पासवान यांनी रविवारी एका रॅलीमध्ये "जर आम्ही सत्तेत आलो, तर नितीश कुमार आणि त्यांचे अधिकारी गजाआड असतील" असं म्हटलं होतं. बक्सरच्या डुमरावमधील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले. बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याचं म्हटलं होतं. नितीश कुमार मुक्त सरकारसाठी लोक जनशक्ती पार्टीने भाजपा समर्थकांकडे देखील मतं मागितली आहेत.