भोपाळ : पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान समजला जाणारा देखणा चित्ता भारतात केव्हा परतणार याची वन्यप्रेमी मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतानाच पुरेशा निधीअभावी ही महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात पडणार काय, अशी भीती निर्माण झाली आहे. देशातून अनेक वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्त्याला मायभूमीत परत आणून त्याचे संवर्धन करण्याची योजना तत्कालीन संपुआ सरकारने इ. स. २०१० मध्ये आखली होती. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या या वन्यजीवांसाठी ५००,००० डॉलर्स एवढी तरतूद करण्यात आली. मध्य प्रदेशच्या नौरादेही अभयारण्यात त्यांचा अधिवास विकसित केला जाणार होता. नामिबिया चित्ता संरक्षण फंडच्या एका पथकाने नौरादेहीचा दौरा करून चित्ते देण्यास सहमतीसुद्धा दर्शविली आहे. मध्य प्रदेशच्या वन विभागाने यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये केंद्राकडे २६४ कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु संबंधित विभागाकडून अद्याप कुठलेही उत्तर मिळाले नसल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव) नरेंद्रकुमार यांनी शुक्रवारी येथे दिली.निधी मिळाल्यानंतरच...देशात चित्त्याचे अखेरचे दर्शन मध्य प्रदेशातच झाले होते. या शेवटच्या चित्त्याचा १९४७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर १९५२ साली तो नामशेष प्राण्यांच्या यादीत गेला. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय)२०१३ मध्ये १६.६ कोटी रुपयांच्या प्राथमिक योजनेचा आराखडा केंद्रात दिला होता. त्यानुसार एकूण ११९७ चौरस कि.मी.च्या क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यापैकी ७०० चौ. कि.मी. क्षेत्रात चित्ता अधिवास निर्मिती करायची आहे. त्या दृष्टीने या भागात वसलेल्या २० गावांचे इतरत्र पुनर्वसन करावे लागणार आहे. येथील जवळपास २६४० कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी २६४ कोटी रुपये द्यायचे आहेत. सिंह स्थलांतरण योजनेतून धडा घेऊन राज्य शासनाच्या वन विभागाने चित्ता संवर्धन योजनेसाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय तसेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे पहिलेच निधीची मागणी केली असून हा निधी प्राप्त झाल्यानंतरच योजनचे काम पुढे सरकेल. (वृत्तसंस्था)
चित्त्याचे भारतात पुनरागमन दिवास्वप्नच ठरणार!
By admin | Published: January 31, 2015 1:37 AM