चर्चमधील कन्फेशन प्रथा बंद करण्यास ख्रिश्चनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 12:13 AM2018-07-29T00:13:18+5:302018-07-29T00:14:10+5:30
चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) पद्धतच बंद करावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने केल्याने वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली/कोची : चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) पद्धतच बंद करावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने केल्याने वाद निर्माण झाला आहे. शोषण करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करा, पण धर्मातील अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, अशी भूमिका ख्रिश्चन समाजाने घेतली आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्सो कन्ननदनम यांनी ही आयोगाची भूमिका आहे, केंद्र सरकारची नाही, असे स्पष्ट केले.
चर्चमध्ये चुकीबद्दल द्याव्या लागणाºया कन्फेशनमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा कन्फेशनचा गैरफायदा चर्चमधील अधिकारी घेत आहे. त्यामुळे ती प्रथा बंद करण्यात यावी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले होते. अशा प्रकारानंतर महिला आयोगाने चौकशी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल व शिफारशी आयोगाने पंतप्रधान, गृहमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री तसेच केरळ व पंजाब या राज्यांचे पोलीस महासंचालक यांना दिला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री अल्फान्सो कन्ननदनम म्हणाले की, ही आयोगाच्या शिफारशीची भूमिका आहे. केंद्राने तसा निर्णय घेतलेला नाही.
ही पद्धत अतिशय जुनी
केरळमधील ख्रिश्चन समाजाने व बिशप संस्थेनेही लैंगिक शोषण करणाºया फादर वा संबंधितांवर कारवाई करा पण त्यामुळे चर्चमधील इतकी जुनी पद्धत बंद करण्याचे कारण नाही. तसेच धर्मामध्ये असा हस्तक्षेप करणे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. मुंबईचे आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशिअस यांनीही आयोगाची शिफारस अयोग्य आहे. असे गैरप्रकार रोखलेच पाहिजेत. पण कन्फेशान बंद करण्याची शिफारस मान्य केली जाणार नाही, असे म्हटले आहे.