CAA Protest: 'हाँगकाँग पॅटर्न' जोरात; इंटरनेट बंदीवर आंदोलकांनी शोधला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:58 AM2019-12-22T10:58:03+5:302019-12-22T11:02:12+5:30
सरकार, प्रशासनाच्या इंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा
चेन्नई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र आंदोलकांनी यावरही तोडगा शोधून काढला आहे. आंदोलकांनी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर सुरू केला आहे. चीनविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलकांनीदेखील याच मार्गाचा वापर केला होता. हाँगकाँमध्ये आंदोलनादरम्यान ब्रिजफाय, फायर चॅटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला होता.
ब्रिजफाय, फायर चॅटच्या मदतीनं ब्लू टूथच्या माध्यमातून काही अंतरावरील व्यक्तींना मेसेज करता येतात. आसाम आणि मेघालयात १२ डिसेंबरपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून ब्रिजफाय डाऊनलोड करण्याचं प्रमाण ८० टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी अमेरिकन अॅप इंटेलिजन्स फर्म ऐपोटॉपियानं दिली आहे. आसाम आणि मेघालयानंतर देशाच्या इतर राज्यांमध्येही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू झाली. त्यामुळे आसाम आणि मेघालयापाठोपाठ इतर अनेक राज्यांमध्येही इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. त्यामुळे या राज्यांतही ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
इंटरनेट सेवा खंडित होण्याच्या आधी देशात दिवसाकाठी सरासरी २५ जण ब्रिजफाय अॅप डाऊनलोड करायचे. १३ डिसेंबरनंतर यात १०० टक्क्यांनी वाढ झाली. सध्या दर दिवशी जवळपास २६०९ जण ब्रिजफाय अॅप डाऊनलोड करत आहेत. ब्रिजफाय अॅपच्या अॅक्टिव्ह यूजर्सची संख्यादेखील ६५ पटीनं वाढली आहे. ११ डिसेंबरच्या आधी ब्रिजफाय अॅप १८४ जण वापरायचे. १२ डिसेंबरपासून हा आकडा वाढून १२,११८ वर पोहोचला आहे. एकट्या दिल्लीत या अॅपच्या डाऊनलोड आणि वापराचं प्रमाण ३० पटीनं वाढलं आहे.