नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:17 AM2019-12-11T01:17:57+5:302019-12-11T01:18:21+5:30
देश विभाजनाचा विचार मुस्लिम लीग-हिंदू महासभेचा
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनीच पहिल्यांदा स्वातंत्र्यपूर्व भारतात धर्मावर आधारित विभाजनाची मागणी केली. काँग्रेसने सदैव देशाच्या अखंडतेचा विचार केला. केंद्र सरकार मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आड पुन्हा देशाचे विभाजन करू पाहत आहे. संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी देशाच्या प्रजासत्ताक असण्यावर घाला घातला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजपवर केला. ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’च्या तिसºया पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात थरूर यांनी रोखठोक मते मांडली.लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी शशी थरूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सीएनएन न्यूज १८ चे संपादक (आऊटपूट) जाका जेकब यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला.
'राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका'या विषयावर बोलताना थरूर यांनी विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले. प्रादेशिक पक्षांचा विस्तार स्थानिक मुद्यांवर झाला. राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या विस्ताराला त्यामुळे नेहमीच मर्यादा राहील, असे नमूद करून थरूर म्हणाले की, भाजपने हिंदू, हिंदुत्व व हिंदुस्थान या त्रिसूत्रीला महत्त्व दिले. काही प्रादेशिक पक्षांनी सर्वसमावेशक भूमिका मांडली. त्यामुळे अनेक राज्यांत एनआरसीला विरोध होईल.
प्रादेशिक पक्ष व केंद्रामध्ये संघर्ष होईल, कारण चार राज्यांचा अपवाद वगळता देशातील सर्व राज्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अथवा सागरी किनारपट्टी आहेत. एनआरसी धर्मनिरपेक्ष 'आयडिया आॅफ इंडिया'च्या विरोधात आहे. काँग्रेसने देशाचे विभाजन केल्यानेच एनआरसीची गरज पडली, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.
शहा यांनी कदाचित शाळेत इतिहासाच्या तासाला लक्ष दिले नाही, अशा शेलक्या शब्दात थरूर यांनी समाचार घेतला. हिंदू महासभा व मुस्लीम लीग या संघटनांनीच धर्मावर आधारित विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्माधिष्ठित विभाजन मान्य नव्हते, असे थरूर म्हणाले.
घुसखोरीच्या मुद्द्याद्वारे भाजपने महागाई, अर्थव्यवस्थेतील अपयशावरून देशवासीयांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न चालविला आहे. एनआरसीचा फटका मुस्लिम समुदायालाच बसणार असल्याने भाजपने योजनापूर्वक हे विधेयक आणले. मात्र काँग्रेस प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊ न भाजपचा विचार निष्प्रभ करेल, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला.
कलम ३७० मुळे काय झाले हे सर्वांनी पाहिले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज दाबण्यात आला. एकीकडे संचारबंदी तर दुसरीकडे दहशतवाद्यांची भीती या दुहेरी अस्वस्थतेत काश्मिरी आहेत. एनआरसीमुळेही एका समुदायाच्या मनात हीच भावना वाढली असल्याचे थरूर म्हणाले.