पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला आहे. सीआरपीएफच्या 38 जवानांना अवंतीपुरामध्ये वीरमरण आल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा संताप आणखी वाढला. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली. मात्र त्याचवेळी, गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अॅलर्ट' जारी करण्यात आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. अडीच हजार जवानांचा ताफा जाण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. मात्र हीच चूक सीआरपीएफच्या जवानांच्या जीवावर बेतली. त्यामुळे आता ही चूक सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली.
Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:11 PM