नवी दिल्लीः उन्नाव बलात्कार पीडित कार दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाली. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात आरोपींकडून जिवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पत्राचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून अहवाल मागवला आहे.सर्वोच्च न्यायालयात हे पत्र कसं आलं, केव्हा आलं आणि या पत्रात काय मागणी करण्यात आली होती, या सर्व तपशीलाचा वृत्तांत सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून मागवला आहे. दुसरीकडे बलात्कार पीडितेच्या घरच्यांनी हे पत्रा 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलं होतं. यात आरोपी आमदाराच्या ओळखीच्यांकडून धमक्या येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. हे पत्र पीडितेची आई, बहीण आणि काकीनं मिळून लिहिलं होतं. तिच्या काकीचा रायबरेलीतल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
नेमके काय आहे प्रकरण? भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मृत्युमुखी पडले आहेत.