नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस ए बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार, रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.
24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्मलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. 1998 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील करण्यात आले. मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे कुलपती म्हणूनही काम पाहिले आहे. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील.
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून दीर्घकाळ (523 दिवस) असणार आहेत. आतापर्यंत 46 सरन्यायाधीशांपैकी फक्त 16 जणांना 500 दिवसांचा कार्यकाळ मिळाला आहे, आता त्यात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची गणना होईल. यापूर्वी सरन्यायाधीश कापडिया (12 मे 2010 ते 28 सप्टेंबर 12) यांना 870 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.