चंदीगड - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी एखाद्या चुकीसाठी शिक्षकांनी शिक्षा केली तर विद्यार्थी ते निमूटपणे सहन करायचे पण आता विद्यार्थी सूड भावनेतून शिक्षकांवरच हल्ला करतात. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बारावीत शिकणा-या एका मुलाने शाळेच्या मुख्याध्यापकांची गोळया झाडून हत्या केली. हरीयाणातील यमुनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
रितू छाबरा असं मृत मुख्याध्यापकांच नाव आहे. विवेकानंद शाळेत त्या मुख्याध्यापक होत्या. बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्याध्यापकांच्या या निर्णयाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने त्याच्याजवळची बंदूक काढली व रितू छाबरा यांची गोळया झाडून हत्या केली.
पालक-शिक्षक सभा सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य पालकांनी व शाळेच्या स्टाफने हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केली. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या 62 वर्षीय रितू छाबरा यांचा जागीच मृत्यू झाला.