ऑनलाइन लोकमत
बंगळूरू, दि. २३ - महात्मा गांधी यांनी आपल्याला गुलामीतून मुक्ती दिली म्हणून आपण अस्वच्छतेला मुक्ती देवू असे सांगतानाच स्वच्छतेसाठी मी येत्या २ ऑक्टोबर रोजी अर्थात महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वत: हातात झाडू घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदी आज बंगळूरूमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
भारतात अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव पाहायला मिळतो. स्वच्छता ठेवणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. देशात स्वच्छता राहावी यासाठी देशभरात २ ऑक्टोबर पासून 'स्वच्छता अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मोदी यांनी दिली.
देशातील जनतेने वर्षभरातील केवळ शंभर तास स्वच्छतेसाठी आपल्याला द्यावे यासाठी मी देशवासिंयाकडे मागणी करतो असे मोदी यांनी भावनिक आवाहनही देशवासिंयाना यावेळी केले.
देशात राबविण्यात येणा-या जन-धन योजनेमुळे गरिबांना फायदा होत असून आतापर्यंत देशात ४ कोटी बँक खाते उघडण्यात आल्याचे मोदी म्हणाले. भारत हा युवकांचा देश असून ६५ टक्के तरूण या देशात राहतात. तरूणांना रोजगार देण्यासाठी आणि तरूणांची स्कील डेव्हल्पमेंट वाढविण्यासाठी खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतकरी सर्वांचे पोट भरतो मात्र शेतक-यांचा खिसा भरण्याकडे कुणाचे लक्ष जात नाही याची आठवण करून देत शेतक-यांसाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.