शिमला : दहशतवादी संघटनेद्वारे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, धमक्यांना घाबरणार नाही, ज्याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम असेल, त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री जयराम ठाकूर मंडी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, याविषयी मला पूर्णपणे माहिती नाही, परंतु जर कोणी 15 ऑगस्टच्या दिवशी तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देणारा ऑडिओ मेसेज व्हायरल केला असेल तर तपास यंत्रणांशी चर्चा करून मेसेज पाठविणार्याचा शोध घेतला जाईल. तसेच, चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग -21 वर खालिस्तानी संघटनांचे झेंडे बाह्य राज्यातून जाणाऱ्या वाहनांवरही लावण्यात आल्याप्रकरणी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी चिंता व्यक्ती केली. अशी प्रकरणे गांभीर्याने घेत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत.
व्हायरल ऑडिओ मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप मिळालेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या दहशतवादी शीख संघटनेच्या ऑडिओ मेसेजद्वारे व्हायरल होत असलेल्या धमकी मेसेजबद्दल माहिती राज्यातील पत्रकारांना मिळाली. यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. ऑडिओमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे शीख फॉर जस्टिसचे प्रमुख नेता गुरपतवंत सिंह पन्नू आणि इतर नेत्यांकडून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना 15 ऑगस्टला राज्यात तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एक मोठा मेळावा घेऊन आधीच पंजाबचा एक भाग असलेल्या हिमाचलला पंजाबमध्ये समाविष्ट केला जाईल, असे या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, ऑडिओमध्ये शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढून राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या ऑडिओ मेसेजमुळे हिमाचल प्रदेशमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.