"सध्या राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत, सिद्धूंच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 07:51 PM2021-09-29T19:51:08+5:302021-09-29T19:54:47+5:30
Congress Rahul Gandhi And Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस (Congress) अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) राजीनामा दिला आहे. सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. याच दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत" असं म्हणत शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल (Congress Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही" असं मत चौहान यांनी व्यक्त केलं. तसेच "पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. चौहान यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.
अब राहुल गांधी भैया कांग्रेस को डुबाने में लगे हैं, बनी-बनाई पंजाब की सरकार निपटा दी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 29, 2021
अच्छे खासे अमरिंदर बने हुए थे, सिद्धू के चक्कर में अमरिंदर को हटाया और फिर सिद्धू भी भाग गये।
अब राहुल गांधी के होते हुए हमें कुछ करने की जरूरत ही नहीं है। pic.twitter.com/DHlIUhqmeA
"राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही"
शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. "सध्या राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही" असं चौहान यांनी म्हटलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत बादल यांनी निशाणा साधला आहे. "सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचंय हेच माहीत नाही" असं म्हटलं आहे. बादल यांनी चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे.
"सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं"
"मी आधीच सांगितले होते की नवज्योत सिंग सिद्धू हे एक दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहीत नाही की ते कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाबकाँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला" असा शब्दांत बादल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सिद्धूंनी पंजाब वाचवण्यासाठी मुंबईला निघून जावं. मी आधीच सिद्धूबद्दल इशारा दिला होता, सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहीत आहे. त्यामुळे जर सिद्धूंना पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं, अशी मी त्यांना विनंती करतो" असा सणसणीत टोला देखील सुखबीर सिंग बादल यांनी लगावला आहे.