अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
भोपाळ :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नोकरशहांना सरळ करून भ्रष्टाचाराला अंकुश लावू, असे वारंवार इशारे देऊनही राज्यात नवनवे घोटाळे व भ्रष्टाचार उघड होत आहे. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने देवासमध्ये गुरुवारी शहर नियोजन विभागातील ड्राफ्टसमन विजय दारियानी याच्यावर छापा घातला. त्यात तो आणि त्याच्या नातेवाइकांच्या नावावर स्थावर व जंगम अशा १० कोटी रुपयांच्या मालमत्ता उघड झाल्या. हा फक्त प्राथमिक अंदाज आहे, असे या शाखेचे पोलीस अधीक्षक दिलीप सोनी म्हणाले.
विजय दारियानी याची उज्जैन, देवास आणि इंदूरमध्ये २५ वर्षे नोकरी झाली. या कालावधीत त्याला सरासरी ४० लाख रुपये वेतनापोटी मिळाले. त्याची बिल्डर्स आणि विकासकांशी हातमिळवणी असल्याचा शाखेला संशय आहे. तो विकासकांना फायदा होईल यासाठी मास्टर प्लॅन्स आणि सरकारी दस्तावेजात बदल करायचा. भ्रष्टाचाराबद्दल पकडला गेला तो दारियानी हा एकटा अधिकारी नाही.
इंदूर महानगरपालिकेचे विजय सक्सेना आणि हिमलाई वैद्य कंत्राटदाराचे बिल काढून देण्यासाठी गेल्या ऑगस्टमध्ये २५ हजार रुपये लाच घेताना पकडले गेले होते. त्यांच्या कार्यालयातून १०.६८ लाख रुपये जप्त झाले होते. लोकायुक्त पोलिसांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सहकार निरीक्षकाला इंदूरमध्ये १० हजार रूपयांची लाच घेताना पकडले होते. त्याच्यासोबत शेतकऱ्याकडून ५१ हजार रुपये लाच घेतलेल्या महसूल अधिकाऱ्यालाही पकडण्यात आले होते. भाजप राजवटीत एकही विभाग हा भ्रष्टाचारमुक्त नाही, असे सरकारमधील सूत्रांनी म्हटले. भोपाळमध्ये नुकताच कांदा खरेदीचा घोटाळा उघड झाला होता. त्यात उद्यानविद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुप्पट भावाने दोन कोटी रुपयांची बियाणे विकत घेतली होती.