लखनऊ - राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या बांधकाम निधीसाठी लोकांकडे आवाहन केलं आहे. भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून ११ रुपये आणि एक वीट असं योगदान द्यावं असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना सांगितले आहे. झारंखड येथील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, ५०० वर्षापासून सुरु असलेला वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी सोडविण्यात आला आहे. काँग्रेस, आरजेडी, सीपीआय-एमएल यांच्यासह अन्य पक्ष कित्येक वर्ष सुरु असलेला हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच लवकरच अयोध्या येथे भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात येणार आहे. मी झारखंडमधील प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की, प्रत्येक घरातून एक वीट आणि ११ रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी द्यावेत. मी त्या प्रदेशातून येतो ज्याठिकाणी प्रभू राम आहेत अन् त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटलं जातं. या राज्यात गरीब, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचं काम केलं जातं. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
त्याचसोबत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे हिंदू, शीख, बौद्ध, इसाई आणि पारसी या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करतायेत. या लोकांना पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्याकडून प्रचंड छळ केला जातो. हे लोकं शरणार्थी जीवन जगत आहेत. यांच्याविरोधात काँग्रेस आंदोलन करते. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतं असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे अयोध्येत राममंदिराच्या उभारण्याच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यायालयीन दालनात या फेरविचार याचिकांची सुनावणी झाली होती.