धक्कादायक! राजधानी एक्स्प्रेसमध्ये लहान मुलीसाठी मागवलेल्या ऑम्लेटमध्ये सापडलं झुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 08:46 PM2022-12-17T20:46:02+5:302022-12-17T20:47:03+5:30
मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये योगेश मोरे नावाची व्यक्ती प्रवास करत होती. या प्रवासदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळले.
नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेस ही देशातील सर्वात चांगली ट्रेन असल्याचे मानले जाते. मात्र या ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या निष्काळजीपणामुळे भारतीय रेल्वेवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीका होत आहे. दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने मागितलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळल्याने टीका होत आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये योगेश मोरे नावाची व्यक्ती प्रवास करत होती. या प्रवासदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळले. यासंदर्भात योगेश मोरे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि पीएमओला टॅग करत झुरळाच्या ऑम्लेटचे फोटो शेअर केले आहेत.
दिल्ली-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेसमध्ये आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना योगेश मोरे यांना हे खराब खाद्यपदार्थ देण्यात आले. 6 डिसेंबर रोजी राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना त्यांनी सकाळी त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीसाठी अतिरिक्त ऑम्लेट मागवले होते. मात्र, ऑम्लेट आल्यावर त्यावर झुरळ दिसल्याने योगेश मोरे हैराण झाले.यानंतर हे खराब ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीला काही झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल योगेश मोरे यांनी ट्विटद्वारे संतापाने केला आहे.
याचबरोबर, योगेश मोरे यांनी आपल्या तक्रारीत रेल्वे मंत्रालय तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांना टॅग केले आहे. दुसरीकडे, रेल्वे युजर्ससाठी ऑनलाइन सपोर्ट सर्व्हिस रेल्वे सेवाने (Rail Seva) योगेश मोरे यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. रेल्वे सेवाने ट्विट केले की, "गैरसोयीबद्दल क्षमस्व. सर, कृपया तुमचा पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर डायरेक्ट मेसेज करा. आयआरसीटीसी अधिकारी." दरम्यान, या प्रकरणी काय कारवाई केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, आयआरसीटीसीकडे गेल्या सात महिन्यांत ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेशी संबंधित 5,000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत ही माहिती दिली. वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की. 1 एप्रिल 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान, आयआरसीटीसीला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत 5,869 तक्रारी आल्या. तसेच, ते पुढे म्हणाले की, "जेवणाच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास आयआरसीटीसीच्या सेवा प्रदात्यावर दंड आकारण्यासह योग्य कारवाई केली जाते."