नवी दिल्ली - उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. उत्तर प्रदेशात थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. थंडीमुळे 41 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच कानपूरमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात प्रचंड थंडी पडली आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांनाही फटका बसल्याने अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वी देशातील आठ राज्यात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला होता. काही भागांत पारा शून्याखाली गेला आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये याआधी 68 जणांचा मृत्यू झाला होता. कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्रही गारठला आहे.
कानपूर, उन्नाव व जालौनमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. इटावात 4.8, बांदात 5.4 डिग्रीसह सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या महिन्यात प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता गारठ्याने हैराण केले आहे. काश्मीरमध्येही थंडीचा कहर असून, श्रीनगरमधील दाल लेक गोठून गेला आहे. मध्य प्रदेश व पंजाबच्या काही भागांमध्ये तापमान 2 ते उणे 1 च्या दरम्यान आहे. अमृतसर व जालंधरमध्ये थंडीचा इतका कहर आहे की, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा तसेच ईशान्येकडील सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांतही कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान 2 अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊं च्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे.