जिनिव्हा : एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशा संख्येने लोक सक्षम होतात, त्यावेळी तयार होणारी सामूहिक रोगप्रतिकारशक्ती कोरोनासंदर्भात अद्याप निर्माण झाली नाही. त्यासाठी आणखी बराच वेळ लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, ५० ते ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन ते त्याचा सामना करतील, त्यानंतर सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल. कोरोना साथीच्या आणखी काही फेऱ्या आल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढेपर्यंत पुढील वर्षभर ही साथ आटोक्यात ठेवण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा.त्या म्हणाल्या, सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूंकडून इतरांना होणाºया संसर्गाची साखळी तुटते. त्यामुळे त्या रोगाचा फैलाव बंद होतो. प्रतिबंधक लसीमुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होते.
नैसर्गिकरित्या सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यापेक्षा तेच काम लसीच्या माध्यमातून पार पाडलेले केव्हाही चांगले असते. नाहीतर तोवर आणखी असंख्य बळी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, साथ आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य उपचार व आवश्यक बंधने पाळणे हेच उपाय आहेत. काही लसींच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर या वर्षअखेरीस त्या सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतील. कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी २०० ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. जितके जास्त पर्याय तितकी अधिक परिणामकारक लस शोधण्यास मदत होईल.५ ते १० टक्के लोकांमध्येच तयार झाल्या अँटिबॉडीजकोरोना साथीचा प्रादूर्भाव झालेल्या काही देशांतील ५ ते १० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. काही देशांमध्ये हेच प्रमाण २० टक्के इतके आहे. या लोकांमुळे ही साथ पसरण्याचा वेग कमी होणार आहे, असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.