भोपाळ: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाला. राजगढ परिसरात कलम १४४ लागू असतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा वाद झाला. या दरम्यान निधी यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली. निधी निवेदिता यांनी भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावल्यानं मोठा वाद निर्माण झाला. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बराच संघर्ष करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काही वेळ लाठीमारदेखील केला. यामध्ये दोन कार्यकर्ते जखमी झाले. राजगढमध्ये संचारबंदी लागू असल्यानं पोलिसांनी भाजपाच्या यात्रेला परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही भाजपा कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढली. राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि पोलीस अधीक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र कार्यकर्ते कोणाचंही ऐकत नव्हते. त्यांनी परवानगी नसतानाही तिरंगा यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोनदा प्रशासकीय अधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. निधी निवेदिता यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी निधी यांच्याशी वाद घातला. यावेळी निधी यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली.
CAA: तिरंगा यात्रेदरम्यान वाद; महिला जिल्हाधिकाऱ्यानं भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 7:43 PM