नवी दिल्ली : देशात फेब्रुवारीत चौथ्यांदा नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी आले आहेत. गत २४ तासातील कोरोना रुग्णांची संख्या ९,१२१ आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या आता १,०९,२५,७१० झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा एका दिवसात १००पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आणखी ८१ लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १,५५,८१३ झाली आहे. देशात १,०६,३३,०२५ लोक रोगमुक्त झाल्याने बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के झाले आहे तर मृत्यूदर १.४३ आहे. देशात उपचाराधिन रुग्णांची संख्या १,३६,८७२ आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के आहे. देशात आतापर्यंत २० कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६,१५,६६४ चाचण्या सोमवारी करण्यात आल्या.
१७ राज्यांत एका दिवसात एकही मृत्यू नाही२४ तासांत १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. तसेच, सहा प्रदेशात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलेला नाही. दमन आणि दीव व दादरा व नगर हवेलीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९९.८८ टक्के आहे.१७ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात गत २४ तासात कोरोनाने मृत्यू झाला नाही त्यात लक्षव्दीप, सिक्किम, हिमाचल, उत्तराखंड, गुजरात, चंदीगड, जम्मू काश्मीर, मेघालय, लडाख, मणीपूर, हरयाणा, अंदमान निकोबार, राजस्थान, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दमन आणि दीव व दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे.
ॲस्ट्राजेनेकाला हूची आपत्कालीन मंजुरी टोरंटो - जागतिक आरोग्य संघटनेने ॲस्ट्राजेनेका लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दक्षिण कोरियाच्या ॲस्ट्राजेनेका - एसके बायो यांनी ही लस तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सहायक संचालक डॉ. मारियांगेला सिमाओ यांनी सांगितले की, ज्या देशांमध्ये अद्याप लस उपलब्ध होऊ शकली नाही, ते आता लसीकरण सुरु करु शकतील. लसीअभावी अनेक देशात अद्याप लसीकरण सुरु झालेले नाही. ॲस्ट्राजेनेका ही लस ब्रिटन, भारत, अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यासह ५० देशात आधीपासूनच अधिकृत आहे.
व्हिटामिन सी परिणामकारक नाही झिंक आणि व्हिटामिन सी घेतल्याने कोरोना रुग्णांची लक्षणे कमी होत नाहीत, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. अमेरिकेतील क्लिवलँड क्लिनिकच्या संशोधकांनी म्हटले आहे की, झिंक हे रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते. व्हिटामिन सी हे एंटीऑक्सिडेंट आणि पेंशीचे नुकसान रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. चार समूहांवर केलेल्या प्रयोगातून विशेष फरक आढळून आला नाही.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लसीसाठी प्राथमिकता?लसीकरण अभियानात न्यायाधीश, न्यायालयाचे कर्मचारी यांना प्राथमिकता देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. वकील अरविंद सिंह यांनी ही याचिका दाखल केली असून यावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल.