सर्वसामान्यांना दिलासा ! सप्टेंबर महिन्यात 200 रुपयांची नोट चलनात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:12 PM2017-08-23T12:12:24+5:302017-08-23T12:15:59+5:30
लवकरच चलनात 200 रुपयांची नोट येण्याची शक्यता आहे. 50 रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर आता लवकरच 200 रुपयांचीही नोट चलनात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली, दि. 22 - लवकरच चलनात 200 रुपयांची नोट येण्याची शक्यता आहे. 50 रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर आता लवकरच 200 रुपयांचीही नोट चलनात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 200 रुपयांच्या नवीन नोटेबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या 100 रुपये ते 500 रुपयांमधील कोणतीही नोट सध्या चलनात उपलब्ध नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे असे म्हणणे आहे की, 200 रुपयांची नोट व्यवहारात आल्यास फायदेशीर ठरेल आणि यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे
दरम्यान, मोठ्या संख्येत नवीन नोट चलनात आल्यानंतर सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सौम्य कांती घोष यांनी म्हणाले आहेत. शिवाय, 200 रुपयांची नवीन नोट चलनात आल्यास रोखीचे व्यवहार सुलभ होतील आणि एकूण चलनातील कमी मूल्याच्या नोटांचीही संख्या वाढेल, असेही घोष म्हणालेत.
एटीएममध्येही मिळणार दोनशे रूपयांची नोट
दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. मात्र सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएममध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही.
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली.