नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला झटका मिळालेला असतानाही भाजपाच्या उपाध्यक्षा उमा भारती यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मोदींशिवाय भाजपामध्ये कोणताही सक्षम नेता नाही, सर्व लोकांना फक्त मोदी हवे आहेत. असं सांगत नरेंद्र मोदी यांना छत्रपती मोदी जिंदाबाद असं म्हणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाने भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी पुस्तक प्रकाशित केले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळली होती. अनेकांनी या पुस्तकावर नाराजी व्यक्त करत भाजपाविरोधात संताप व्यक्त केला होता.
छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर रयतेने दिली होती. शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना होण्यावरुन शिवप्रेमी संतप्त होते. त्यात उमा भारती यांनी छत्रपती मोदी असा उल्लेख केल्याने महाराष्ट्रात या विषयी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी ट्विट केलं आहे त्यात म्हटलंय की, जवळपास दीड वर्षापासून देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका, त्यानंतर लोकसभा निकाल, अलीकडेच काही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यातून हे स्पष्ट होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता नाही. संपूर्ण देशाने मोदींना आत्मसात केलं आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद असं कौतुक करण्यात आलं आहे.
उमा भारतींच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत छत्रपती ही पदवी मोदींना शोभून दिसते का? असा सवाल केलाय, तसेच छत्रपती शिवरायांनी जितके कार्य केले, त्याच्या कणभरही काम करुन दाखवा असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीने 63हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 7 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार
भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया
गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका
'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'
भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक