हेअर कट बिघडविल्याने दोन कोटींची भरपाई! ग्राहक न्यायालयाचा ‘आयटीसी मौर्य’ हॉटेलला जबर तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:13 AM2021-09-25T07:13:03+5:302021-09-25T07:16:59+5:30
ही ४२ वर्षीय महिला १८ एप्रिल २०१८ रोजी हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनमध्ये गेली होती. तिला एका मुलाखतीसाठी केस कापून घ्यायचे होते. तिचे केस लांबसडक होते. पण...
नवी दिल्ली : एका महिलेचा हेअरकट बिघडविणे चेन्नईतील पंचतारांकित हॉटेल ‘आयटीसी मौर्य’मधील सलूनला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला २ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहकन्यायालयाने ‘आयटीसी मौर्य’ला दिले आहेत.
ही ४२ वर्षीय महिला १८ एप्रिल २०१८ रोजी हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनमध्ये गेली होती. तिला एका मुलाखतीसाठी केस कापून घ्यायचे होते. तिचे केस लांबसडक होते. तिने केसांची टोके खालून ४ इंच कापायला सांगितले. सलूनवाल्याने उलटे केले. तिचे सगळे केस कापून केवळ ४ इंच ठेवले. केस कापले जात असताना तिने आपला चष्मा काढून ठेवला होता, तसेच मान खाली केलेली होती. त्यामुळे आपले सगळे केस कापले जात आहेत, हे तिला कळलेच नाही. केस कापून झाल्यानंतर तिने चष्मा घातला तेव्हाच तिला हे कळले.
तिने तक्रार केल्यानंतर सलूनने माफी मागितली, तसेच तिला फी आकारली नाही; पण हेअरड्रेसरवर कारवाईही केली नाही. तिच्या म्हणण्यानुसार, सलूनच्या सरव्यवस्थापकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावर ती आयटीसी हॉटेलचे सीईओ दीपक हकसर यांना भेटली. त्यांनी तिला गंगावण दिले, तसेच केस लवकर वाढावेत यासाठी मोफत उपचारही देऊ केले. उपचारादरम्यान, सलूनने पुन्हा हलगर्जीपणा केला. जास्तीचा अमोनिया वापरल्यामुळे महिलेच्या राहिलेल्या केसांचे नुकसान झाले. डोक्यात आग होऊ लागली.
स्वप्न अर्धवट राहिले...
ही महिला टॉपची मॉडेल होऊ इच्छित होती; पण केस गळाल्यामुळे तिचे स्वप्न अर्धवट राहिले. तिची मन:स्थिती बिघडली. त्यात तिची नोकरीही गेली. या सगळ्यांची भरपाई म्हणून तिला २ कोटी रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहकन्यायालयाने आता आयटीसी मौर्य हॉटेलला दिला आहे.