नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी शायरीतून नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर निशाणा साधला आहे. 'एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना।', असा इशारा देत त्यांनी शायरीतून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शायरीद्वारे मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी एका रडणा-या वृद्ध व्यक्तीचा फोटोदेखील ट्विट केला आहे. तसेच, ''सरकारची नोटांबदी ही राष्ट्रीय आपत्ती आहे नोटाबंदी ही एक शोकांतिका असून पंतप्रधानांच्या अविचारी निर्णयामुळे देशातील लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. नोटाबंदीनं उद्धवस्त झालेल्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभे आहे'', असेही ते म्हणालेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विट करत जनतेचे आभार मानले आहेत. काळ्या पैशाविरोधातील मोहीमेला साथ दिल्याबद्दल जनतेचे आभार, असे ट्विट त्यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे. आज राज्याराज्यात केंद्रीय मंत्री नोटाबंदीचे महत्व समजावून सांगणार आहेत.
सोशल मीडियावर नोटाबंदीवरुन मोदी सरकारला केलं जातंय लक्ष 8 नोव्हेंबर ही तारीख जसजशी जवळ येते, त्याप्रमाणे आता लवकरच नवा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील, असे मेसेज फिरत आहेत. याशिवाय, मोदींच्या भाषणाची ‘मित्रों’ ही शैलीही ट्रेंडमध्ये आहे. त्या दिवसाची आठवण करून देणारी ‘तुमको भूला ना पायेंगे’ या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे.
काँग्रेसनेच बाहेर काढला मोदींहून जास्त काळा पैसा
दरम्यान, केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन वर्षांत जेवढा काळा पैसा शोधून जप्त केला गेला त्याहून कितीतरी जास्त काळा पैसा काँग्रेस सरकारने त्याआधीच्या एकाच वर्षात बाहेर काढला होता, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या दाव्याच्या पुष्ठयर्थ आकडेवारीही दिली. यावरून नोटाबंदीचा निर्णय अविचारी होता व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्याची गरज नव्हती, असे ते म्हणाले.
काँग्रेसने दिलेली काळ्या पैशाची वर्षनिहाय आकडेवारी अशी: सन २०१३-१४ : १ लाख १ हजार १८३ कोटी रु. सन २०१४-१५: २३ हजार २१८ कोटी रु. सन २०१५-१६ : २० हजार ७२१ कोटी रु. आणि सन २०१६-१७ : २९ हजार २११ कोटी रु.
देशाच्या विकासाला खीळ घालून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा हा अविचारी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी काँग्रेसची मागणी असून त्यासाठी ८ नोव्हेंबर हा नोटाबंदीचा वर्षपूर्तीदिन पक्षातर्फे ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे.नोटाबंदीच्या त्रासामुळे मृत्यू पावलेल्या देशवासियांना यावेळी राज्यात ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येईल, असेही चव्हाण म्हणाले.