नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत काही दिवसांपूर्वी एक मोठी चूक झाली होती. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास 15 ते 20 मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. यावरून राजकारण तापलं आहे. याच दरम्यान आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. पाच जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असताना सुरक्षेमधील त्रुटींच्या प्रकरणावरुन शर्मा यांनी हा आरोप केला आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या अटकेचीही मागणी केली. या कथित कटामध्ये चन्नी यांचा सहभाग लक्षात घेत त्यांना अटक करण्यात आली पाहिजे, अशी मागणी यांनी केली आहे. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना "सर्व पुरावे हेच दर्शवत आहेत की काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा कट रचला होता" हिमंत बिस्वा शर्मा असा दावा केला आहे.
शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीने मोदींच्या सुरक्षेमधील गोंधळाच्या प्रकरणानंतर केलेल्या स्टींग ऑपरेशनचाही यावेळी संदर्भ दिला आहे. या स्टींग ऑपरेशनमध्ये पंजाबमधील पोलिसांना दोन जानेवारी रोजीच पंतप्रधानांना जीवे मारण्यासंदर्भातील कटाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आलेला. या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यापद्धतीची विधानं केली त्यावरुन त्यांना या कटाचा अंदाज होता असंही शर्मा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खोचक टीका करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता. एअरपोर्टवर जिवंत पोहोचू शकलो याबाबत मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांग, असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
"पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनीही पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. "भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते" असं म्हणत स्मृती इराणी यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच "पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास जाणूनबुजून खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला, 20 मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचवलं?" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं होतं.