निझामाबाद - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीतेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि टीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. तसेच टीआरएस सरकारने लोकांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. निझामाबाद शहराला लंडनप्रमाणे स्मार्टसिटी बनवण्याचे स्वप्न राव यांनी दाखवले. मात्र, प्रत्यक्षात येथील नागरिकांना पाणी, वीज यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही मोदींनी सांगितले.
तेलंगणातील निझामाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा घेण्यात आली. त्यावेळी मोदींनी टीआरएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीका केली. तसेच टीआरएस आणि काँग्रेस म्हणजे घराणेशाहीच्या नियमानुसार चालणार पक्ष आहेत. हे दोन्ही पक्ष तेलंगणात मैत्रीपूर्ण मॅच खेळत असल्याचा टोलामोदींनी लगावला. तर या दोन्ही पक्षांकडून होणारे वोट बँकेचे राजकारण हे विकासासाठी घातक असून वाळवीप्रमाणे असल्याचे मोदींनी म्हटले.
केंद्र सरकारने गरिबांच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. मात्र, राव यांनी या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला. राव हे स्वत:ला असुरक्षित समजतात. भविष्य, पूजा, लिंबू-मिर्ची यांवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी आयुष्यमान भारत योजनेत सहभाग न घेत नागरिकांनाही त्यातच अडवण्याचा प्रयत्न केल्याचे मोदींनी म्हटले.