India-China Faceoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजपने आक्रमक होत राहुल गांधींवर पलटवार केला. आता राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून, भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न विचारले आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर भाजपने आक्रमक होत राहुल गांधींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. यावर आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय?
काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी पवन खेडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना काही प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान चीनला का घाबरतात, त्यामागचे रहस्य काय? काळ्या यादीत टाकलेल्या चिनी कंपन्यांना तुम्ही वारंवार कंत्राटे का देता? तुमचा चीनशी काय संबंध? अशी विचारणा केली आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. तुम्ही २० जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील भारतीय हद्दीत चीनकडून कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे का सांगितले? मे २०२० पूर्वी नियमितपणे गस्त घालत असलेल्या पूर्व लडाखमध्ये हजारो चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचण्यापासून चिनी लोकांना तुम्ही आमच्या सैन्याला का रोखू दिले? माउंटन स्ट्राइक कोअरची स्थापना करण्यासाठी १७ जुलै २०१३ रोजी कॅबिनेटने मंजूर केलेली योजना तुम्ही का सोडली? तुम्ही चिनी कंपन्यांना पीएम केअर्स फंडात योगदान देण्याची परवानगी का दिली? गेल्या दोन वर्षांत तुम्ही चीनमधून आयात विक्रमी पातळीवर का वाढू दिली? सीमेवरील परिस्थिती आणि चीनकडून आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांवर संसदेत चर्चा होऊ नये, असा आग्रह का धरताय? तुम्ही १८ वेळा चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटलात आणि अलीकडेच बाली येथे शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच चीनने तवांगमध्ये घुसखोरी सुरू केली आणि सीमेवर एकाच बाजूने बदल करणे सुरूच ठेवले. तुम्ही देशाला विश्वासात का घेत नाही? असे एकामागून एक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, या सात प्रश्नांवर बोलणे हे पंतप्रधानांचे राजकीय कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"