काँग्रेसची माघार, राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:46 AM2020-03-13T11:46:44+5:302020-03-13T11:57:27+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबई - महाविकास आघाडीच्या गोटातील राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रामधल्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित झाली असून आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी चर्चा सुरू होती. अखेर, काँग्रेसला माघार घ्यावी लागली, असून राष्ट्रवादीचा उमेदवारी जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने या जागेवर हक्क सांगितल्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. गत निवडणुकांवेळी राष्ट्रवादीकडून तारिक अन्वर हे राज्यसभेवर होते. मात्र, यंदा अन्वर यांनी निवडणुकीत न उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे, फौजिया खान यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत. उर्वरीत तीन जागांवर भाजपाला संधी आहे. भाजपाकडून उदयनराजे भोसले, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदी यांना आपला उमेदवार घोषित केलं आहे. काँग्रेसकडून राजीव सातव यांना संधी मिळाली आहे.